भागवत कराड यांच्या घरावर मोर्चाचा प्रयत्न; काँग्रेसच्या 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
भागवत कराड यांच्या घरावर मोर्चाप्रकरणी औरंगाबादेत काँग्रेसच्या 120 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांचा देखील समावेश आहे.
औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याविरोधात आज औरंगाबादमधील काँग्रेस (Aurangabad congress) कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल दिला होता. त्यानुसार, आज शनिवारी सकाळीच शेकडो कार्यकर्ते क्रांती चौक येथे जमले होते. त्यानंतर हा मोर्चा केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घराकडे निघाला. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडवलं. दरम्यान आता या प्रकरणात काँग्रेसच्या तब्बल 120 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह काही नेत्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्यासह तब्बल 120 जणांचा समावेश आहे.