जालन्यातील बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे आणि खासदार कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खासदार कल्याण काळे यांनी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली. भोकरदनमध्ये आमदार संतोष दानवे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी रावसाहेब दानवे हातात काठी घेऊन माणसांना घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंवर चांगलाच खोचक टोला लगावला. मला जनतेने लोकसभेला निवडून दिलं त्यामुळे काही लोकांना काठी हातात घेऊन माणसं हाकलण्याची वेळ आली आहे, असा खोचक टोला काळे यांनी लगावला त्यानंतर जनतेत एकच हशा पिकला.