Breaking | म्हाडाच्या गाळेधारकांना मोठा दिलासा, 400 कोटींचं व्याज सरकारकडून माफ
म्हाडाच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अभय योजने अंतर्गत 1 एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
मुंबई : म्हाडाच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अभय योजने अंतर्गत 1 एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. गेल्या 21 ते 22 वर्षांपासून नागरिकांनी सेवा शुल्क भरलं नव्हतं. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरु केल्याची आव्हाड यांनी दिली आहे. त्यानुसार थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
या अभय योजनेनुसार म्हाडा वसाहतीतील रहिवाशी थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता 5 वर्षात 10 हप्त्यात भरु शकणार आहेत. म्हाडाच्या इमारतीत राहणाऱ्या 1 लाख 81 हजार रहिवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसंच आता म्हाडा कार्यालयात जाऊन रांगेत उभं राहून बिल भरण्याची गरज राहणार नाही. ऑनलाईन प्रणालीद्वारे तुम्ही घरबसल्या हे सेवा शुल्क भरु शकणार आहात, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली आहे.