Nana Patole | शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याची भूमिका नाही : नाना पटोले
मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या भागाला, तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे.
लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह राज्यात अनेक भागात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा केलाय. आज महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेनं प्रतिसाद दिला. भाजपनं बंदला विरोध केला. भाजप शेतकऱ्यांच्या हत्तेचं समर्थन करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप नेते रस्त्यावर आले नाहीत म्हणून त्यांना बंद कळाला नसेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
‘शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका’
मागील वर्षी नैसर्गिक आपत्ती झाली. त्याची पाहणी करायला केंद्राची टीम आता आली आहे. मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे, असंही पटोले यावेळी म्हणाले. महाराष्ट्र बंदसाठी जबरदस्ती झाली असेल तर त्याचं समर्थन काँग्रेस करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली त्याचं आम्ही समर्थन करत नाही. ज्या कुणी जाळपोळ आणि बसेसची तोडफोड केली, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. हा सरकारचा बंद नव्हता तर पक्षीय बंद होता, असं पटोले म्हणाले.