मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षाचे गिफ्ट, नांदेड ते हडपसर रेल्वेला सुरुवात
मराठवाड्यातील प्रवाशांसाठी पुण्याला जाण्याकरिता आज नव्या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेचा जालन्यातून शुभारंभ करण्यात आला
जालनाः मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकरिता आज आणखी एका रेल्वेसेवेला सुरुवात झाली. नवीन वर्षात नांदेड ते हडपसर या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यात या रेल्वेचा शुभारंभ केला. त्यामुळे एरवी पुण्याला जाण्यासाठी बस किंवा ट्रॅव्हल्सने 500 ते 800 रुपये भरावे लागतात. सामान्यपणे सीटिंगच्या जागेवर प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचे तिकिट अत्यंत स्वस्त आकारण्यात येत आहे. द्वितीय श्रेणीतील तिकिटासाठी 185 रुपये भरावे लागतील. तर स्लीपर कोचसाठी 315 रुपये दर आकरले जातील. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना ही रेल्वे सोयीस्कर ठरणार आहे.