रस्ता नाही, प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् आठ किलोमीटरची पायपीट
खुटवडा ते कुडब्यापाडा गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक आमदाराच्या दुर्लक्षतेमुळे आजही अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नसल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना काही संपता संपेना असंच चित्र आजही पाहायला मिळत आहे. अक्राणी तालुक्यातील खुटवडा गावातील मन विचलित करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. गावातील प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. बांबूची झोळी बनवून आठ किलोमीटरची पायपीट या गर्भवती महिलेच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी केली आहे. तर वेळेत रूग्णालयात न पोहोचल्याने नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशिक्षित सासूने आपल्या सुनेची वाटेतच प्रसूती केली आहे. यानंतर नवजात बालकासोबत या गर्भवती महिलेला मालवाहतूक वाहनातून रुग्णालयात पोहोचवण्यात आले. सध्या या महिलेवर राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून नवजात बालक आणि महिला सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.