‘परवडत नाही तर कांदा खाऊ नका, २-४ महिने कांदा खाल्ला नाही तर…’, शिंदे सरकारमधील नेत्याचं वक्तव्य
VIDEO | कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील शेतकरी आणि व्यापारी आक्रमक अन् शिंदे सरकारमधील नेत्यानं केलं अजब वक्तव्य, म्हणाले...
नाशिक, २१ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. केंद्राच्या कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संताप झाल्याचे पाहायला मिळत आहे तर यानिर्णयाविरोधात कांदा उत्पादक अग्रेसर असलेला नाशिक जिल्हा येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच शिंदे सरकारमधील नेत्यानं अजबच वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असे वक्तव्य दादा भुसे यांनी केले. इतकेच नाही तर दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं? असा सवालही दादा भुसे यांनी उपस्थित केला. कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार आहेत त्या व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेलय हा सत्ताधारी किंवा विरोधकांचा विषय नाही. काही वेळा कांद्याला 200 ते 300 भाव मिळतो, काही वेळा २ हजारापर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावं लागतं. हा नाशिक जिल्ह्यात संवेदनशील विषय आहे. चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं नियोजन केलं जाईल, असेही दादा भुसे यांनी सांगितले.