Nashik : 8 दिवसांनंतर त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांसाठी आजपासून खुलं
5 जानेवारीपासून त्र्यंबकेश्वर मंदिर संवर्धनाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलं होतं
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे मंदिर. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. गेल्या ५ जानेवारीपासून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ५ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत या मंदिरात त्र्यंबकेश्वराच्या शिवलिंगाचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू होते.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाच्या पिंडीची झीज रोखण्यासाठी वज्रलेप आणि मंदिर देखभाल अशा कामासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मंदिराच्या आत गर्भगृहामध्ये असलेल्या शिवलिंगाची झीज झाली होती. त्यामुळे शिवलिंगाला वज्रलेप लावण्याचे काम पुरातत्व विभागाकडून करण्यात आले. याशिवाय मंदिरातील इतर दुरूस्तीचे काम जे दिर्घ काळापासून प्रलंबित होते, ते सुद्धा या काळात पूर्ण करण्यात आले. असे असले तरी यादरम्यान मंदिरात नित्यनियमाने केली जाणारी पूजा सुरू होती. मात्र आज ८ दिवसांनंतर त्र्यंबकेश्वरचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.