Kolhapur Mahalaxmi : अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी दिल्यानंतर गाभाऱ्यात घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली.
राज्यभरात शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात देखील नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रथा-परंपरेनुसार, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली आहे. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली. शारदीय नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस असल्याने असंख्य भाविकांनी अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. भक्त-भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष करून महिला भाविकांची मोठी गर्दी अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिर परिसरात झाली आहे. महिला वर्गाकडून अंबाबाईला साडी-चोळी आणि खणा-नारळाची ओटी आवर्जून भरली जाते. त्यातच आज नवरात्रोत्सवाचा पहिलाच दिवस असल्याने महिलांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना देखील सुरुवात झाली आहे.