बाबा सिद्दिकींची हत्या; कधी-कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये मृतदेहाचं शवविच्छेदन सुरु
बाबा सिद्दीकी यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तान याठिकाणी बाबा सिद्दींकींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जाणार असून त्याचा मृतदेहाचे दफन केले जाणार असल्याची माहिती मिळतेय
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री सव्वा ९ ते साडे ९ वाजेच्या दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथे घडली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर वांद्र्यासह संपूर्ण मुंबईत तणावाचे वातावरण असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे साडे पाच वाजता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीतील कूपर रूग्णालयात आणण्यात आला असून त्यावर शवविच्छेदन सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होणार आहे. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे नेले जाणार असून रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवाचे मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.