राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री हत्या करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता, असे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. या व्यक्तीने प्रत्यक्षदर्शीकडे फोनवरून ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. इतकंच नाहीतर पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही या प्रत्यक्षदर्शीला देण्यात आली आहे. तर एका अज्ञात व्यक्तीने साक्षीदाराला हत्येसाठी बोलावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एकतर ५ कोटी रुपये दे नाहीतर तुला बाबा सिद्दीकीप्रमाणे मारून टाकू, अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने साक्षीदाराला दिली आहे. या धमकीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा कॉल कोणी केला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याशिवाय लॉरेन्स बिश्नोई टोळी किंवा अन्य कोणत्याही गुन्हेगारी गँगने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.