‘लाडकी बहीण’ दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?
'लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात अजितदादा पुढे गेले आहेत. ते रोज मिटिंग आणि सभा घेण्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे कदाचित वाटत असेल. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्र सभा घेत आहेत. अजितदादा त्यांच्या मतदारसंघात प्रचार करतात. सर्व योजनांवर ते भाष्य करतात. त्यामुळे त्यांनी योजना हायजॅक केली असं वाटत असेल'
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात सध्या चांगलीच गाजतेय. दरम्यान, यावरून महायुतीतील नेत्यांमध्ये श्रेय वादावरून लढाई सुरू असल्याची टीका विरोधक करताय. त्याला कारणही तसंच आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने नुकतीच एक जाहीरात प्रसिद्ध केली. यामध्ये लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्री किंवा शासनाची नसून अजित पवारांची आहे. इतकंच नाहीतर महिलांना देण्यात येणारे १५०० रूपये हे अजित पवारांकडून देण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. महायुतीतील नेत्यांमध्येच लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. यावरून मंत्री छगन भुजबळ यांना सवाल केला असता त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. ते TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलत होते. ‘भांडणं नाही. म्हटलं तर भांडणं आहेत. भांडण कुठे नाही. प्रत्येक घरात भांडणं राहतात. पण एकत्र राहतात ना. भांडण इकडे आहे, तिकडे आहे. पण शेवटी एकत्र राहतोच ना. तात्पुरती असतात ती. प्रत्येक चर्चेला वादावादी म्हटलं तर कठिण आहे. मग मंत्रिमंडळात प्रश्न विचारताच येणार नाही. प्रश्न विचारलं तर त्याला वादावादी म्हणता येत नाही. मला तसं वाटत नाही.’, असे छगन भुजबळ म्हणाले. तर दादांनी योजना हायजॅक केली असं का समजतात कळत नाही. हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. शिंदे हे मंत्रिमंडळाचे प्रमुख आहे. जे काही करतो ते एकत्रित करतो, असेही त्यांनी म्हटले.