अजित पवार महायुतीत नाराज? अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादा का नव्हते? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर
सध्या मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आहे. अशातच मुंबईतील लालबागच्या राज्याच्या दर्शनाला राजकीय नेते मंडळी दाखल होतायत. अशातच आज शरद पवार यांनी राजाचं दर्शन घेतलं त्यानंतर अमित शाहांनी देखील राजाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस होते मात्र अजित पवार नव्हते. त्यांच्याच अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत असताना अमित शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं. यावेळी शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार सोबत होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेच दिसले नाहीत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे महायुतीमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचे विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात येतंय. त्यामुळे अजित पवार महायुतीमध्ये नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा सुरु झाली आहे. अमित शाहांसारखे दिग्गज नेते मुंबईच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांची गैरहजेरी दिसल्यास चर्चा तर होणारच. मात्र आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. “काल अजित पवार यांचे बारामतीत ठरलेले कार्यक्रम होते. आज अजित पवार मुंबईत आले आहेत. अजित दादा अमित शाहंसोबत आहेत. त्यांना सोडायला विमानतळावर जातील. तर सागर बंगल्यावर भाजपच्या बैठकीत अजित पवार कशाला जातील? महायुतीची संयुक्त बैठक असेल तर अजित पवार जातील” असं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.