दर्जा फार उतरलेला, शरद पवारांनी काढली संभाजी भिडेंची लायकी; बघा नेमकं काय म्हणाले?
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबतची सध्या आपली भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला होता. त्याच भिडेंनी आता पलटी मारल्याची चर्चा आहे.
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सत्तेतील एकनाथ शिंदे-फडणवीस आणि अजित पवार हा प्रश्न सोडवतील, असा विश्वास संभाजी भिडेंनी व्यक्त केला होता. मात्र आता मराठ्यांनी देश चालवायचा, आरक्षण कुठून काढलंय? असं संभाजी भिडे यांनी म्हणत युटर्न घेतला आहे. यासदंर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार हे पत्रकारांवर भडकले तर त्यांनी संभाजी भिडेंची लायकीच काढली. “संभाजी भिडे हे काय कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का? काहीही प्रश्न विचारतात. म्हणून तुम्हाला भेटायचं नाही म्हणतो. हल्ली कसेही प्रश्न तुम्ही विचारतात, आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक…”, असं वक्तव्य करत शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलणं आणि प्रतिक्रिया देणं टाळल्याचे पाहायला मिळाले.