जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवार यांनी काय दिले संकेत?
महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून शर्यत होती. मात्र शरद पवार यांनी आपला पक्ष देखील शर्यतीत असल्याचे दाखवून दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार यांच्या डोक्यात नेमकी कोणाची नावं आहेत?
इस्लामपूरच्या सभेतून शरद पवार यांनी पहिल्यांदाच मोठे संकेत दिलेत. जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची शक्ती आणि दृष्टी आहे, असे म्हणत शरद पवार यांनी थेट जयंत पाटील यांच्या नावाचे संकेत थेट मुख्यमंत्रिपदासाठी दिलेत. इस्लामपूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेचा समारोप झाला. यासभेमध्ये जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान जयंत पाटील यांच्यावरून मुख्यमंत्रीपदाची घोषणाबाजी झाली. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, ए गप्प बस.. घोषणा देऊ नको… घोषणाबाजी करून कोणी मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी खूप उठाबशा काढाव्या लागतात, असं मिश्कील वक्तव्य केलं. तर त्यानंतर शरद पवार यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच यावरून मोठे संकेत दिलेत. ‘महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ज्यांच्यामध्ये आहे ते जयंत पाटील…’, असे शरद पवार म्हणाले आणि मुंबईत सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जयंत पाटील यांनी चिमटा काढला. शरद पवार असे कोणतेही संकेत देत नाही. तर सुप्रिया सुळे यांचं नावही पुढे आहे, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी आमच्याकडून कोणाही स्पर्धेत नाही, असं म्हटलं होतं. मात्र आता इस्लामपूरच्या भाषणातून जयंत पाटील यांचं नाव घेत त्यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दृष्टी आणि शक्ती असल्याचे म्हटलं आहे. म्हणजेच मविआमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे शरद पवारांना सुचवायचे आहे.