ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी जयंत पाटील यांचं ट्विट अन् म्हणाले…
VIDEO | जयंत पाटील यांनी ईडी चौकशीपूर्वी कार्यकर्त्यांना दिली साद, 'माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी...',
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. ते ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांची आज या चौकशीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे काही गोष्टी सोसावा्या लागणारच, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी दिली. तसेच ईडी चौकशीला हजर होण्यापूर्वी जयंत पाटील यांनी ट्वीट करून मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोणीही मुंबईला येऊ नये, अशी विनंतीही केली होती. मात्र तरीही आज ईडी कार्यालयाबाहेर आणि पाटील यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. ‘आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे. ‘, असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले होते.