NEET Exam : विद्यार्थींनीना अंतर्वस्त्रं उलटे परिधान करायला लावले, ‘नीट’च्या परीक्षेवेळी कुठं घडला धक्कादायक प्रकार
VIDEO | 'नीट'च्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रामध्ये आलेल्या विद्यार्थिनींसोबत घडला लज्जास्पद प्रकार, विद्यार्थिनींना अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले अन्....
शंकर देवकुळे, सांगली : देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली आहे. ही परीक्षा पार पडत असताना सांगलीमध्ये मात्र या परीक्षेदरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार विद्यार्थिनींच्या बाबतीत घडल्याचे समोर आले आहे. सांगलीमध्ये झालेल्या नीट परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले आणि त्यानंतर त्यांना परीक्षा द्यायला लावण्याचा लज्जास्पद प्रकार घडला आहे. याबाबत जागृत पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. तसेच सोशल मीडियावरही या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यासाठी चक्क त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले. या ठिकाणी विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थिनींना देखील परीक्षा द्यायची म्हणून आपले कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालून परीक्षा देण्याची हिंमत केली. परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. पालकांना याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.