Sanjay Raut | सहकार खातं शहांकडे गेलं तर घाबरण्याचं कारण नाही, संजय राऊत
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने केलेल्या खातेवाटपात सहकार खातं अमित शहांकडे देण्यात आलं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्या सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयाचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. शहा यांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे ते या क्षेत्रात काही तरी चांगलं करतील. सहकार खातं त्यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारने नवं मंत्रालय तयार केलं आहे. केंद्राला सहकाराला काही मदत करायची इच्छा असेल. सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शहांकडे नव्या खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. त्यातून काही चांगलं होऊ शकतं. शहांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील, असं राऊत म्हणाले.