विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
Haryana Assembly Vinesh Phogat Election Result 2024 : हरियाणात जुलानामधून विनेश फोगाट काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला.
हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातमधून काँग्रेस उमेदवार आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांचा दणदणीत विजय झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडलनं हुलकावणी दिली असली तरी राजकीय क्षेत्रात नशीब आजमवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा प्रयत्नच नाहीतर त्यांच्या या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. भाजपच्या योगेश बैरागी यांच्यावर मात करत विनेश फोगाट यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. भाजपाने एक दलित चेहरा म्हणून कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती. तर इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. दरम्यान निकालाच्या मतमोजणीच्या 14 व्या फेरीमध्ये अखेर विनेश फोगाट जुलानामधून 5 हजार 557 मतांनी आघाडीवर होती. अखेर विनेश फोगाटचाच दणदणीत विजय झाला. 2005 नंतर जवळपास 19 वर्षांनी जुलानामधून विनेश फोगाटच्या रुपाने काँग्रेसला ही जागा जिंकता आली आहे.