दगडूशेठ गणपती मंदिरात ५० लाख सुवासिक फुलांची आरास, बघा मनमोहक दृश्य

| Updated on: Apr 10, 2023 | 11:34 PM

VIDEO | श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सवाचे आयोजन

पुणे : मोग-याच्या सुवासिक फुलांसह गुलाब, लीली, चाफा, झेंडूच्या फुलांची आरास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त करण्यात आली. तब्बल ५० लाख सुवासिक फुलांचा गंध मंदिर परिसरात दरवळत होता. लाडक्या गणपती बाप्पाला फुलांचा महानैवेद्य दाखविल्याचे मनोहारी दृश्य यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते. तब्बल २५० महिला व ७० पुरुष कारागीरांनी सलग ३ दिवस पुष्पसजावटीची तयारी केली होती. गणरायाच्या मूर्तीला शुंडाभूषण, कानवले, मुकुट, अंगरखा यांसह फुलांनी साकारलेली विविध आभूषणे परिधान करण्यात आली होती. गणरायाचे मनोहारी रूप पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली. मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्यासोबतच हे दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

Published on: Apr 10, 2023 11:34 PM
गोव्यात मॉक ड्रील, कोविड प्रतिबंधासाठी उपाययोजना काय?
संजय राऊत यांचा कोर्टाला अर्ज, पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी; काय आहे प्रकरण?