विधानसभेचं तिकीट कापलं अन् शिंदेंचे आमदार ढसाढसा रडले; म्हणाले, ‘देवमाणसाला सोडून घातकींसोबत….’
उद्धव ठाकरेंसारख्या देवमाणसाला सोडून घातकी माणसांसोबत गेलो, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिली आहे. पालघरमधून यंदा श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना तिकीट मिळालं आहे, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडलेत.
पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा. तिकीट कापलं म्हणून नाराजी, बंडखोरी किंवा कार्यकर्त्यांकडून दबावतंत्र अवलंबलं जातं. पण तिकीट कापलं गेल्यानंतर वनगासह त्यांच्या पत्नी अक्षरशः ढसाढसा रडलेत. ‘उद्धव ठाकरे यांच्यासारख्या देव माणसाला सोडलं. त्यांच्यामुळे मी आमदार झालो पण घातकी माणसांना साथ देऊन घात झाला’, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिली. बंडखोरीच्या वेळी एकनाथ शिंदेंना साथ देऊन सुद्धा माझं तिकीट का कापलं गेलं? असा सवालच त्यांनी एकनाथ शिंदेंना केला. तर सत्ता स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार श्रीनिवास वनगा यांचा एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याच आमदार श्रीनिवास वनगा तिकीट कापलं गेल्यानं अश्रू अनावर झालेल्या वनगांवर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. वास्तविक सत्ता स्थापनेनंतर आपल्यासोबतचा एकही आमदार पडू न देण्याचा ग्वाही एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिली होती. मात्र वनगा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट