स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, श्री विठ्ठल रुक्मिणीचे कळस या ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंढरपूर मंदिर परिसर तिरंगामय झाला आहे. तर आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्याकडून श्री विठ्ठल मंदिरात तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. या दिवसाच्या निमित्ताने झेंडू, शेवंती आणि तुळशीच्या पानांचा वापर करुन देवाचा गाभारा, सोळखांबी, प्रवेश द्वार आणि मंदिराच्या सभा मंडपात तिरंग्याची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विठ्ठलास चॉकलेटी रंगाचा अंगारखा पिवळ्या रंगाचे पितांबर आणि तिरंग्याचे उपरणे असा पोशाख करण्यात आला आहे.