‘लालपरी’ला भोलेनाथ पावला, महाशिवपुराण कार्यक्रमामुळे ST ची बक्कळ कमाई, ७ दिवसांत कमावले…
सात दिवसात या महाशिवपुराण कथा कार्यक्रमात देण्यात आलेल्या सेवेमुळे उत्पन्नाच्या बाबतीत महादेव हे लालपरीला पावले असून जळगाव एसटी विभागाची दिवाळी झाली आहे. अवघ्या सात दिवसात एसटी विभागाला तब्बल दीड कोटी रुपयांच उत्पन्न मिळालं
जळगाव, १२ डिसेंबर २०२३ : जळगावातील वडनगरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय महाशिवपुराण कथा कार्यक्रम पार पडला. या सात दिवसात भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयीसाठी एसटी विभागाकडून तब्बल ३०० पेक्षा जास्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. सात दिवसात या कथा कार्यक्रमात देण्यात आलेल्या सेवेमुळे उत्पन्नाच्या बाबतीत महादेव हे लालपरीला पावले असून जळगाव एसटी विभागाची दिवाळी झाली आहे. अवघ्या सात दिवसात एसटी विभागाला तब्बल दीड कोटी रुपयांच उत्पन्न मिळाल आहे. जिल्हाभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून कथेच्या ठिकाणी भाविकांना नेण्यासाठी तसेच सोडण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली होती. तर दीड लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक बसेसच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्या माध्यमातून जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न हे जळगाव बस विभागाला मिळाले आहे, असे जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी म्हटले.