PM Narendra Modi : आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, विरोधकांनी चर्चा करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या जुन्या इमारतीत पोहोचले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. तसेच सर्व खासदारांना संसदेच्या अधिवेशनात उत्साहाने सहभागी होत चर्चेसाठी आमंत्रित केलं.
नवी दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आजपासून सुरुवात होत आहे. 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन चालणार आहे. आज सकाळीच 9 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या जुन्या इमारतीत पोहोचले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. भारतीय संसद (Indian Parliament) ही आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. येथे खुल्या मनाने संवाद होईल. गरज असेल तर वाद-विवाद व्हावी, टीका व्हावी, पण या सदनाचा सकारात्मकतेसाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केली. तसेच सर्व खासदारांना संसदेच्या अधिवेशनात उत्साहाने सहभागी होत चर्चेसाठी आमंत्रित केलं. विशेष म्हणजे आजच्या संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेतलं जात आहे. 21 ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.