बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा झाला? पोलिसांनी सांगितलं…
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडली. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? पोलिसांनी नेमकी काय दिली माहिती?
बदलापूर पोलीस ठाण्यातही अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल असल्याने तपासासाठी तळोजा कारागृहात ठाणे क्राईम ब्रांचची टीम ट्रान्सफर वॉरंटसह आली. संध्याकाळी साडे पाच वाजता आरोपी अक्षय शिंदेला ठाणे क्राईम ब्रांचच्या ४ जणांच्या टीमनं ताब्यात घेतलं. पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे आणि २ कॉन्स्टेबल अक्षय शिंदेला घेऊन निघाले. पोलिसांची व्हॅन संध्याकाळी ६ ते सव्वा ६ वाजेच्या दरम्यान, मुंब्रा बायपासवर आली असता अक्षय शिंदेंने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेची सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतली. अक्षय शिंदेंने पोलिसांच्या दिशेने ३ राऊंड गोळीबार केला त्यापैकी १ गोळी पोलीस अधिकारी निलेश मोरेंच्या डाव्या मांडीला लागली तर दोन राऊंड इतरत्र फायर झाले. यानंतर स्वरक्षणासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी झाली त्यात तो जखमी झाला. यानंतर त्याला कळव्याच्या शासकीय रूग्णालयात आणलं. यानंतर त्याला ज्युपीटर हॉस्पिटल पाठवण्यात आलं मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.