मुंबईतली सर्वात मोठ्या निवडणुकीला स्थगिती, तरीही ठाकरे गटाकडून मोठं पाऊल
VIDEO | मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीला अचानक स्थगिती देण्यात आल्याने उडाली एकच खळबळ, ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयावरुन थेट भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | मुंबई महापालिकेकडून 9 दिवसांपूर्वी सिनेट निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र अचानक अर्ज सादर करण्याच्या एक दिवस आधी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने परिपत्रक जारी करत निवडणुकीला स्थगिती दिली. सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असली तरीही ठाकरे गटाच्या युवासेनेकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठाने हे उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांच्यासोबत काही कार्यकर्ते मुंबई विद्यापीठात निवडणुकीला का स्थगिती दिली? याचा जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेने संपूर्ण दहा जागांवर आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आम्ही काल ऑनलाईन आणि आज ऑफलाईन असं आम्ही आमच्या युवासेनेचं संपूर्ण पॅनल उभं केलेलं आहे” , असं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं. तर “गेल्यावेळी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही 10 पैकी 10 जागांवर जिंकलो. यावेळी सुद्धा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या युवासेनेचं पॅनलल लढेल आणि परत एखदा सर्व जागा आम्ही जिंकू”, असं वरुण सरदेसाई म्हणाले.