अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकून घेऊ नये. मताच्या राजकारणामुळे तुम्ही स्वतःला अडचणीत आणू नका, अट्रोसिटी दाखल होऊ शकतो', प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
गेल्या सहा ते आठ वर्षात मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले आहेत. यावेळी महायुती सरकारने त्यांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक पाऊल टाकले आहे. तर सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यावरून एकच गोंधळ राज्यात सुरू आहे. असातच प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा सल्ला दिला आहे. ‘एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय अंतिम असतो. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यात आणू नये. आधिवासी संघटना मागे पुढे पाहणार नाही. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटीशन टाकायला कमी करणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवं की, अॅट्रोसिटीच्या कायद्याखाली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर केस करता येते. या मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कोणतीही अशी कृती करू नका जेणेकरून तुमच्यावर कारवाई होईल, मग बोंबलत बसायचं नाही’, असा इशाराच प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिला आहे. यासह कायद्याप्रमाणे त्यांनी वागावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.