Pune Corona Update : पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं चिंता
कोणतेही निर्बंध गणेशोत्सव काळात ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे आगमन मिरवणुका, विसर्जन मिरवणुका थाटामाटात निघाल्या होत्या. यावेळी झालेल्या गर्दीमुळे संक्रमण वाढल्याची शक्यता आहे.
पुणे : गणेशोत्सवानंतर पुण्यात कोरोना (Pune corona update) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही गणेशोत्सवात (Ganpati Festival in Pune) झालेल्या गर्दीचा परिणाम आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra Corona Update) एकूण सक्रिय रुग्णांपैकी 27 टक्के रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. एकूण 1 हजार 222 सक्रिय कोरोना रुग्ण सध्याच्या घडीला पुण्यात आहेत. कोरोना महामारीचा प्रभाव काहीसा कमी झाल्यामुळे यंदा पूर्ण क्षमतेनं गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला होता. कोणतेही निर्बंध गणेशोत्सव काळात ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे आगमन मिरवणुका, विसर्जन मिरवणुका थाटामाटात निघाल्या होत्या. या दरम्यान, झालेल्या गर्दीतून कोरोना संक्रमण वाढलं असण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केलीय. त्यामुळे येत्या काळात संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. राज्यात सध्याच्या घडीला 4 हजार 540 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.