विनोद तावडे यांना घेरलं, पैशांचं वाटप अन् भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
पैसे वाटप करण्याचा आरोपावरुन नालासोपारा येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला. भाजप केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह नालासोपारा येथील भाजप उमेदवार राजन नाईक यांना हॉटलमध्ये घेरल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात विधानसभा निवडणूक उद्यावर आहे. काल प्रचार संपला असताना आता उद्या मतदान होणार त्यापूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडीने भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावरूनच विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांत हॉटेलमध्ये घेरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजप-बविआ या दोन्ही गटात तुफान राडा झाला आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत या हॉटलमध्ये हा प्रकार घडला. दरम्यान, जोपर्यंत विनोद तावडे हॉटेलच्या बाहेर येऊन बोलणार नाहीत, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. विनोद तावडे यांनी कोट्यावधी रुपये आणले होते, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केली. त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत तावडेंना सोडणार नाही. माफ करा मला जाऊ द्या, अशी विनंती करणारे फोन विनोद तावडे करत आहेत. 25 फोन विनोद तावडे यांनी केले आहेत, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.