Rahul Gandhi on Manipur : ‘मोदींना पंतप्रधानपदाचं गांभीर्य कळत नाही’, राहुल गांधी मोदी यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी यांचा घेतला समाचार, काय सोडलं टीकास्त्र?
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी विरोधकांसह विशेषतः काँग्रेस प्रणीत इंडियाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात मणिपूर हिंसेवर बोलणं अपेक्षित असताना त्यांनी त्यावर काहीच मिनिटं भाष्य केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संसेदत 2 तास 13 मिनिट बोलले. शेवटी फक्त 2 मिनिट ते मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. निरपराध लोकांची हत्या केली जात आहे. बलात्कार होत आहेत. पण पंतप्रधान हसत आहेत, त्यांचे जोक सुरु आहेत. हे त्यांना शोभत नाही”, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्लाबोल केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचं गांभीर्य कळत नाही, असे म्हणत खोचक टोला लगावला. “मणिपूरमध्ये सुरु असलेला मूर्खपणा भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवेल. पण मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यांना आग विझवायची नाहीय” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.