बदलापुरकरांचा संताप अनावर, रेल्वे रूळावर उतरलेल्या नागरिकांकडून पोलिसांवरच दगडफेक; आंदोलकावर लाठीचार्ज

| Updated on: Aug 20, 2024 | 1:36 PM

बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तर संतप्त बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, रेल्वे रुळावर उतरलेल्या आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक केली जात आहे.

Follow us on

बदलापूर रेल्वे स्थानकावर संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन केले आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून हे रेल रोको आंदोलन सुरू असल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतूक सेवेवर झाला आहे. कल्याण ते कर्जत या मार्गावर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गेल्या तीन तासांपासून ठप्प आहेत. दरम्यान, आरोपीला फाशी नाही तोपर्यंत हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा बदलापुरकरांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे रूळावर उतरलेले आंदोलक मागे हटण्यास काही तयार नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याचे पाहायला मिळत आहे. तर पोलीस लाठीचार्ज करत असल्याने संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापुरात घडलेल्या चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर बदलापुरकरांचा संताप अनावर झाला आहे. आरोपीवर कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बदलापुरची जनता रस्त्यावर उतरली आहे.