राज ठाकरेंचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? ‘या’ जागांवर पहिल्यांदाच मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या दोन याद्यांमधून ५८ उमेदवारांची नावं समोर आली आहेत. मुंबईत पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा मनसे असे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.
स्वबळाचा नारा देत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने ४५ जणांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीनंतर आम्ही सत्तेत असू असे राज ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र त्याच सत्तेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तीन-तीन पक्ष एकत्रित आल्याने मनसे स्वबळावर सत्तेत जाणार की युती आघाडी करणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनसे १४० जागा जिंकू शकते असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये सर्वाधिक असल्याचे मानले जाते. मनसेच्या पहिल्या यादीत मुंबईत १८, ठाण्यात ११, पुण्यात ३, नाशिकमध्ये अद्याप एकही नाही. तर इतर उर्वरित महाराष्ट्रात १३ उमेदवार उभे केलेत. पहिल्या यादीत अनेक मतदारसंघ असेही आहेत, जिथे मनसेचं इंजिन पहिल्यांदाच निवडणुकीच्या स्पर्धेत धावणार आहे. कोल्हापूर कागल, सांगली तासगाव, सोलापूर उत्तर, नगर श्रीगोंदा, जामखेड, जळगाव शहर येथे पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मनसेचं इंजिन येथे धावणार आहे.