राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; चुणूक दाखवली… बीडचा बदला ‘मनसे’नं ठाण्यात घेतला

| Updated on: Aug 12, 2024 | 10:33 AM

बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकून आंदोलन केल्यानंतर त्याचा बदला ठाण्यात घेतला गेला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसे कार्यकर्त्यांनी शेण, नारळ फेकलंय. यानंतर ही फक्त चुणूक होती, असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

Follow us on

बीडचा बदला मनसैनिकांनी ठाण्यात घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसैनिकांनी शेण, बांगड्या आणि नारळ भिरकावले. बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी सुपाऱ्या फेकत सुपारीबाज अशा घोषणा दिल्यात. तर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण आणि नारळ फेकून हिशेब चुकता केलाय. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मेळावा होता. त्यासाठी ठाकरे ठाण्यात दाखल होताच संतप्त मनसैनिकांनी त्यांच्या ताफ्याला टार्गेट केलं. दरम्यान, ठाण्यात झालेल्या राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. ‘काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता. ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते, असं राज ठाकरे म्हणाले. तर फक्त ‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट तसे’ उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे.’