‘माझ्या आयुष्यातील अखेरचे दिवस मी…’, रतन टाटांचं दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, होतंय व्हायरल
Ratan Tata Last Viral Speech : प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचं एक अखेरचं भाषण सध्या चांगलंच व्हायरल होतंय. जे आसामच्या दिब्रुगढ येथे झालं होतं.
२९ एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठ शेअर करताना, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आसाममधील दिब्रुगढ येथील एका सरकारी कार्यक्रमाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाने अनेकांची मने जिंकली. तेच रतन टाटांचं भाषण आज त्यांच्या निधनानंतर व्हायरल होतं आहे. रतन टाटा आपल्या भाषणातून म्हणाले की, “माझ्या आयुष्यातील अखेरचे दिवस मी आरोग्यासाठी समर्पित करतो. आसामला असं एक राज्य बनवा, आसामला प्रत्येकजण ओळखेल आणि सर्वांना आसाम ओळखेल. आसाम राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा तो दिवस आहे जो आसामला आरोग्य आणि कर्करोग उपचारांच्या बाबतीत एका उंचावर घेऊन जाईल”, पुढे ते असेही म्हणाले, कॅन्सरच्या उपचारासाठी उच्चस्तरीय आरोग्य सुविधा, जी राज्यात आतापर्यंत उपलब्ध नव्हती, ती आसाममध्ये आणण्यात आली आहे. त्यामुळे आसाम आता म्हणू शकतो की भारतातील एक लहान राज्य देखील जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधांनी सुसज्ज आहे, असे टाटा म्हणाले होते.