रतन टाटांचे निधन, सचिन तेंडुलकरने वाहिली श्रद्धांजली; NCPA येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव दाखल
रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतासह जगभरातल्या उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे.
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी ९ आक्टोबर रोजी निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील NCPA येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. यानंतर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहचेल. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी देखील रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. कुलाब्यातील निवासस्थानी रतन टाटांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी सचिन तेंडूलकरने दर्शन घेतले.