विधानसभेच्या तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या गटात
विधानसभेच्या निवडणुकीत एका तिकिटासाठी एकाच घरातच 2 पक्ष तयार होताना दिसतंय. निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे भाजप नेते गणेश नाईक यांचे सुपत्र संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पाहायला मिळत आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतल्या तिकीटांच्या समीकरणामुळं आता घरांतही 2-2 पक्ष झाल्याचं दिसतंय. नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. कुडाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार, नितेश राणे भाजपचे आमदार आहेत. वडील आणि भाऊ भाजपात असले तरी तिकीटासाठी निलेश राणे बंड करुन शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. महायुतीत कुडाळ-मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याने निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांशी निलेश राणेंची लढत होताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, नवी मुंबईतही भाजपला गणेश नाईकांच्या घरातूनच धक्का बसलाय. नाईकांचे पुत्र, संदीप नाईकांनी 28 माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गणेश नाईकांना ऐरोलीतून विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय. मात्र बेलापूरमधून भाजपनं तिकीट न दिल्यानं, संदीप नाईकांनी तुतारीवर लढण्याचा निर्णय घेतला. आता बेलापूरमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संदीप नाईक अशी थेट लढत होताना दिसणार आहे.