रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA मध्ये घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन

| Updated on: Oct 10, 2024 | 5:19 PM

रतन टाटांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. साधारण ४५ मिनिट प्रार्थना केल्यानंतर टाटांचं पार्थिव विद्युत दाहिनीवर ठेवण्यात येणार आहे आणि अंत्यविधी केले जाणार आहे.

Follow us on

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशासह जगभरात शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांचे पार्थिव सर्वसामान्यांसह काही मान्यवरांना अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे ठेवण्यात आले होते. NCPA मधून रतन टाटांची अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झाली. वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. NCPA मध्ये रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असताना प्रसिद्ध रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रतन टाटांचे अखेरचे दर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “व्यक्तीगत पातळीवर रतन टाटा यांचं निधन हे माझ्यासाठी खूप दु:खद आहे. मी माझा जवळचा मित्र गमावला. जेव्हा-जेव्हा माझी रतन टाटा यांच्याशी भेट झाली, तेव्हा-तेव्हा मला त्यांच्यापासून प्रेरणा, ऊर्जा मिळाली. प्रत्येक भेटीनंतर त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर वाढत गेला. ते एक उत्तम मानवी मुल्य जपणारे व्यक्ती होते” अशी भावना मुकेश अंबानी यांनी रतन टाटा यांच्या निधनानंतर व्यक्त केली होती.