सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीचा विकास, ‘या’ मार्गावर सुरू होणार रो-रो सेवा
VIDEO | मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मेट्रो रेल्वेबरोबरच जलवाहतुकीचा पर्याय, मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर नवी मुंबई, ठाणे-कल्याण, मुंबई-अलिबाग अशा प्रवासी जलवाहतुकीसाठी 1 हजार 133 कोटींचा निधी
मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | राज्याला लाभलेल्या मोठ्या किनाऱ्याचा फायदा घेण्यासाठी किनारपट्टीवरील जलवाहतुकीला चालना देण्यासाठी सागरमाला हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत १ हजार १३३ कोटी रूपयांचे तब्बल ३४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबई, ठाणे-कल्याण, मुंबई-अलिबाग अशा मार्गावर ही रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतल्या वाढत्या वाहतूककोंडीवर मात करण्याठी मेट्रो रेल्वेबरोबरच जलवाहतुकीचा पर्याय शोधण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई व आसपासच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा- भाईंदर शहरांभोवती जलवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी देण्यात येतो. या योजनेत वसई, ठाणे-कल्याण या राष्ट्रीय जलमार्ग ५३ मध्ये जलवाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात भाईंदर, कोलशेत, काल्हेर व डोंबिवली या चार ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने जेटी व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी ११९ कोटी ३८ लाख रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट’कडून पर्यावरणाचा दाखलाही दिला आहे.