‘माझा कुणाच्याही व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, पण काही लोकांनी त्या शब्दांचा अर्थाचा विपर्यास केला’, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिली. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या गावगाड्याची भाषेमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माझे ते शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.’ जतमधील सभेतील वक्तव्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊ खोत नरमल्याचे पाहायला मिळाले. तर ‘ही गावगाड्याची भाषा आहे. एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागली की आम्ही त्याला म्हणतो जा आरशात जाऊन बघ जा… गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रूजावं लागतं, त्याच मातीत राबावं लागतं आणि त्या मातीतच मरावं लागतं. त्यावेळी मातीची आणि गावगाड्याची भाषा समजते’, असं सदाभाऊ खोत म्हणालेत. जतमधील एका सभेत शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र आपली भाषा ग्रामीण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.