मकाऊ की रातें… संजय राऊत यांच्याकडून पुन्हा इशारा, आणखी एक Video टि्वट
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊच्या कॅसिनोतील एक फोटो पोस्ट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. भाजप आणि संजय राऊत यांच्यात जोरदार तूतू-मैंमै होताना दिसतंय. अशातच पुन्हा संजय राऊत यांच्याकडून आणखी एक मकाऊमधील व्हिडीओ ट्वीट करण्यात आलाय
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या ट्विटद्वारे त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर भाजप आणि संजय राऊत यांच्यात जोरदार तूतू-मैंमै होताना दिसतंय. अशातच पुन्हा संजय राऊत यांच्याकडून आणखी एक मकाऊमधील व्हिडीओ ट्वीट करण्यात आलाय. इतकंच नाही तर मकाऊ की रातें.. पिक्चर अभी बाकी है.. असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आलं असून चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राऊतांनी ट्वीट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी साडेतीन कोटी रूपये उडवल्याचा आरोप केला होता. तर माझ्याकडे आणखी २७ फोटो आणि ५ व्हिडीओ असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला होता.