Saamana : महाराष्ट्र म्हणजे भारताचे भूषण पण गेल्या एक-दीड वर्षात महाराष्ट्राच्या नशिबी फक्त…, सामनातून सरकारवर टीकास्त्र
VIDEO | 'गेल्या आठ-नऊ वर्षांत दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची 'हवा' खराब झाली आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या लौकिकाला काळिमा लागला, सामना अग्रलेखाद्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | घाणेरड्या राजकारणामुळे महाराष्ट्राची हवा खराब झाली आहे, असे म्हणत सामना अग्रलेखाद्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या आजवरच्या लौकिकाला काळिमा लागला असल्याचा घणाघातही सामनातून करण्यात आला आहे. ‘गेल्या आठ-नऊ वर्षांत दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची ‘हवा’ खराब झाली आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या लौकिकाला काळिमा लागला. येथील सत्ताकारणाची गुणवत्ता घसरली. नशेबाजीचा विळखा महाराष्ट्रालाही पडतो की काय, इतपत सत्ता आणि सत्ताधाऱ्यांचे प्रदूषण झाले.’, असे म्हणत सामनातून निशाणा साधला आहे.
तसेच महाराष्ट्र म्हणजे कालपर्यंत भारताचे ‘भूषण’ होतं. मागील एक-दीड वर्षात महाराष्ट्राच्या नशिबी फक्त ‘दूषण’च येत आहे. त्यात वायू प्रदूषणाची भर पडली आहे. आता जनतेलाच या ‘कलुषित’ सरकारला घालवून महाराष्ट्राचे वातावरण पुन्हा एकदा शुद्ध आणि समृद्ध करावे लागेल!’ असे म्हणत खोचक टोलाही लगावला आहे.