‘मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई आमच्यासाठी नवी नाही’, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात राऊतांना 15 दिवसांच्या कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राऊतांना जामीन मंजूर केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आज माझगांव कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी किरीट सोमय्या हे देखील सुनावणीसाठी उपस्थित होते. कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. कोर्टाने याआधी राऊतांना 15 दिवासांची कोठडी सुनावली होती. पण ती शिक्षा देखील आता कोर्टाकडून स्थगित करण्यात आली आहे. तर 50 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. याप्रकरणी संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘न्यायालयीन लढाई आमच्यासाठी नवीन नाही, ही न्ययालयीन प्रक्रिया सुरूच असते. निवडणुकीच्या काळात त्या कामातून आम्हाला कुठेतरी गुंतवून ठेवायचं. पण कायदा आम्हाला कळतो. जनतेच्या हितासाठी आम्ही काही विधानं केली असतील, त्यावर कोणी अब्रूनुकसानाची दावा ठोकला असेल तर तो हेतू बरोबर नाही’, असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, खालच्या कोर्टात आम्हाला शिक्षा ठोठावली आम्ही वरच्या कोर्टात गेलो. आम्हाला खात्री आहे. हा खटला नव्याने चालवला जाईल त्यावेळी आम्ही जे भ्रष्टाचारासंदर्भात मुद्दे मांडलेत पुरावे दिलेत, त्यावर पुन्हा विचार केला जाईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.