‘त्या’ मंत्री, अधिकाऱ्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती, काय लिहिलं पत्र?
राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचार, अनियमित बदल्या-बढत्यांचा व त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : राज्यातील आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. यासह मंत्री तानाजी सावंत आणि दादा भुसे यांच्यावर आरोप करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्रात राऊत म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचार, अनियमित बदल्या-बढत्यांचा व त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो असे बोलले जाते. यामुळे संपूर्ण खात्यात असंतोष आहे व त्याचा फटका गरीबांना बसत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारीही त्यास जबाबदार आहेत. माझ्या समोर आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची, अनियमिततेची प्रकरणे पुराव्यासह आली आहेत. हा सगळाच प्रकार गंभीर तसेच राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा आहे. नियमबाह्य बढत्या, बदल्या हा एक मोठा उद्योग आरोग्य विभागात बनला असून या उद्योगाचे ‘संचालक’ संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराबाबत माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी. राज्याची आरोग्य यंत्रणा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांचे पोस्टमार्टेम व्हावे ही विनंती.