गुलाबराव पाटील यांच्या ‘त्या’ आरोपांवर संजय राऊत म्हणाले, ‘त्यांना खुर्च्या मोजण्याचं कंत्राट देणार’
VIDEO | गुलाबराव पाटील यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी काय लगावला खोचक टोला, नेमकं काय म्हणाले राऊत बघा व्हिडीओ
जळगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा झाली. ही सभा विशाल झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या सभेला गर्दी कमी होती, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी तर पाचोऱ्यातील मैदानाची क्षमता आणि मैदानात ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या खुर्च्यांच्या नियोजनाबाबतचा आकडाच सांगितला. तसेच संपूर्ण जळगावात एक लाख लोक बसतील एवढ्या क्षमतेचं मैदानच नसल्याचा दावा करत ठाकरे गटाचा हा दावा गुलाबराव पाटील यांनी फोल ठरवला. पाचोऱ्याच्या सभेत एक लाख खुर्च्या नव्हत्या. त्या मैदानाची क्षमताच 25 हजाराची असून उद्धव ठाकरे यांच्या सभेला 18 हजार खुर्च्या होत्या आणि सभेला 12 हजाराच्यावर लोकं नव्हते. एक लाख संख्या बसेल एवढं ग्राउंड जळगाव जिल्ह्यात नाही. मग पाचोऱ्यामध्ये कसं असणार? असा सवालच गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘गुलाबराव पाटील यांना आम्ही खुर्च्या मोजण्याचं कंत्राट दिलं होतं. गुलाबराव पाटील यांना आमच्या प्रत्येक सभेत खुर्च्या मोजण्याचं कंत्राट देऊ. ‘, असे म्हणत राऊतांनी खोचक टोलाही लगावला.