मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘सरकार सकारात्मक…’
VIDEO | गेले सात दिवसापासून मराठा क्रांती मोर्च्याचं आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्टपणेच सांगितले, 'मराठा आंदोलकांच्या मागण्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका'
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर २०२३ | गेले सात दिवसापासून मराठा क्रांती मोर्च्याचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे मुख्य आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आज सातव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरकार यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा हे आंदोलन मागे घेण्यासाठी पाऊल उचलत नसल्याची टीका आता विरोधकांव होत आहे. यावर शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. संजय शिरसाट म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली निघाला पाहिजे कारण मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण या आरक्षणाला पाठिंबा देतोय आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. यासंदर्भात बैठक झाली आहे. यासंदर्भात पुरावे सापडले आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे’, असे संजय शिरसाट म्हणाले.