अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे भोसले संतप्त प्रतिक्रिया, ‘अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा…’
बदलापूर घटनेतील आरोपीने केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं, मात्र या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली बेधडक भूमिका मांडली आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं सोमवारी एन्काऊंटर करण्यात आली. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यामध्ये दोन पोलीस जखमी झालेत. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बदलापूर येथील घटनेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी बेधडक प्रतिक्रिया दिली. अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारले पाहिजे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. माध्यमांशी बोलत असताना उदयनराजे भोसले यांनी सत्ताधारी असो किंवा विरोधक यांच्या कुटुंबाबरोबर अशी घटना घडली असती तर त्यांनी काय केलं असतं. अशा घटनेमध्ये मी स्वतःला त्या कुटुंबाच्या जागी ठेवून व्यक्त होत असतो. गोळ्या घालून मारणं हे फार सहज झालं. यापेक्षा अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेने तुडवून अशा लोकांना मारलं पाहिजे, अशी आक्रमक प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.