काँग्रेस पाटील यांचा संताप मधुरिमा राजे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पाहायला मिळाला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा पंजाच गायब झालाय. त्यामुळे जर लढायचंच नव्हतं तर कशाला तोंडघशी पाडलं, अशा शब्दात सतेज पाटील चांगलेच भडकले. आता काँग्रेसने राजेश लाटकर यांना पाठिंबा दिला असून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार घोषित केलाय. विशेष म्हणजे कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र एकाच दिवसात ही उमेदवारी बदलून मधुरिमा राजेंचा तिकीट दिलं. दरम्यान, अर्ज मागे घेत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार शाहू महाराज छत्रपती हे देखील उपस्थित होते. एकाच घरात दोघांना पदं नको अशी भूमिका छत्रपती शाहू महाराज यांनी घेतली. शाहू महाराज स्वतः कोल्हापुरातून काँग्रेसचे खासदार आहेत. मधुरिमाराजे या शाहू महाराजांचे पूत्र मालोजीराजेंच्या पत्नी आणि शाहू महाराजांच्या सून आहेत. तर नाईलाजाने मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे घेतल्याची प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली.