दिल्लीतील JNU विद्यापीठात पुन्हा राडा! ‘त्या’ डॉक्युमेंट्रीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात दगडफेक
गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीची डॉक्युमेंट्री पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर जेएनयू विद्यापीठात दगडफेक
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीची डॉक्युमेंट्री पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात ही दगडफेक झाली. सध्या विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही दगडफेक झाल्याची घटना घडली.
ही डॉक्युमेंट्री दाखवण्यास विद्यापीठ प्रशासनाचा विरोध होता. या नकारानंतरही जेएनयूच्या अध्यक्षांनी या माहितीपटाचे स्क्रिनिंग होणार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्री दाखवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र यावेळी विद्यापीठ परिसरातील वीज, इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये मोठ्या संख्येने साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. याबाबत कोणतीही तक्रार झाली तर गुन्हा नोंद केला जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.