मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठा बंदोबस्त, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर; नेमकं काय घडलं?
संतप्त ट्रक चालकांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखल्याचे पाहायला मिळाले. केंद्र सरकारने नव्याने पारित करत असलेल्या मोटार वाहन कायद्यानुसार मोठी शिक्षा आणि दंड ठोठावल्या जाणार असल्याच्या सोशल मीडियाच्या व्हायरल मॅसेज वरून असंघटित ट्रक चालकांनी महामार्ग रोखून धरला होता.
मुंबई, २ जानेवारी, २०२४ : केंद्र सरकारने नव्याने पारित करत असलेल्या मोटार वाहन कायद्यानुसार मोठी शिक्षा आणि दंड ठोठावल्या जाणार असल्याच्या सोशल मीडियाच्या व्हायरल मॅसेज वरून असंघटित ट्रक चालकांनी महामार्ग रोखून धरला होता. वाहन धारकांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखल्याचे पाहायला मिळाले. तर संतप्त ट्रकचालकांनी महामार्गावर झालेल्या आंदोलनाची प्रशासनाला कोणतीही माहिती किंवा निवेदन न देता, महामार्गावर अचानक एकत्र जमवून, गैर कायदेशीर मार्गाने दगड, लाठ्या, काठ्या हातात घेऊन, राष्ट्रीय महामार्ग रोखून धरून महामार्गावरील वाहन धारकांना वेठीस धरत, दगडफेक केली. इतकंच नाहीतर शासकीय वाहन, पोलिसांना धक्काबुकी करत शासकीय मालमत्तेचे नुकसानही केले आहे. याप्रकारामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल या महामार्गावर हिंसक संप झाल्याचे पाहायला मिळाले. म्हणूनच पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान, आज सकाळपासून या महामार्गावर वाहतूक सुरूळीत सुरू असल्याची माहिती आहे.