हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान अन् पायपीट करून पदरी गढूळ पाणीच
VIDEO | नाशिकच्या या भागात भीषण पाणीटंचाई, महिलांना हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट, बघा काय आहे त्यांची व्यथा
नाशिक : इगतपुरी तालुक्यात भीषण पाणी टंचाईला नागरिक सामोरे जात आहेत. पावसाळ्यात सुमारे 4000 मिलिमीटर पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईच्या झळा या येथील नागरिकांना सोसाव्या लागतायेत. पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता महिलांना जवळपास तीन किलो किलोमीटरपर्यंत दऱ्या-खोऱ्यात उतरून चढून पायपीट करावी लागत आहे. काहींना पाणी मिळतंय तर काहींना आल्या पावली माघारी परतावे लागतं आहे. एवढं करून देखील झऱ्यातील गढूळ पाणी प्यावं लागतंय. उन्हाळ्यात का होईना प्रशासन पाण्याचे व्यवस्था करून द्यावी अशी अपेक्षा हे लोक व्यक्त करीत आहेत.
इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातरवाडी वाघाचा झाप मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती आहे. या आदिवासी नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील चार पाच विहिरींमधील पाणी केमिकलच्या रसायनामुळे दूषित झाल्याने येथील नागरिकांना घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीतील झऱ्यात पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय. उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झालीये. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईंने त्रस्त झाल्याचे समोर आले आहे.